Adsense


 
कान फुटणे अथवा कानातून पू येणे या आजाराची अनेक कारणे असतात. विशेषत: लहान मुलांमध्ये कान फुटणे अथवा कानातून पू येण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळते व अशा या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मुख्यत: सर्दी झाल्यावर लहान मुलांमध्ये कानाच्या पडद्यास छिद्र पडून कानावाटे चिकट, पातळ पू येणे सुरू होते. कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालणे अथवा कानाला मार लागणे. दूषित पाण्याने आंघोळ केल्याने कान फुटू शकतो.सुरक्षित व असुरक्षित हे कान फुटण्याचे प्रकार. यापैकी दुसर्‍या प्रकारामध्ये कानाचे हाड कुजते व त्याचा संसर्ग इतर जवळच्या नाजूक भागांना होऊन कानामागे पू होणे, आंतरकर्णांना आजार होणे, मेंदूमध्ये व मेंदूभोवतीच्या आवरणामध्ये संसर्ग व पू होऊन जिवास गंभीर धोका होऊ शकतो. सुरक्षित प्रकारच्या कानाच्या आजारामध्ये कानामधील हाडांची साखळी व्यवस्थित करून कानाचा पडदा व्यवस्थित बसवून कान कोरडा करणे हे शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट असते. असुरक्षित प्रकारच्या कानाच्या आजारामध्ये कानाच्या पडद्यामागे कोलेस्टेटोमा नावाचा आजार असतो. या आजाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कानाचे नाजूक भाग व कानाचे हाड कुजते व झडते. या आजाराच्या शस्त्रक्रियेत असा आजार पूर्णपणे काढून कानातील सर्व खराब झालेले हाड काढून कान सुरक्षित करणे हे उद्दिष्ट असते. कानाच्या आजाराची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही औषधी व प्रतिजैविके (कानात टाकण्याचे थेंब) देऊन कानातील सूज कमी करतात व कानाची क्ष-किरण तपासणी करून व इतर आवश्यक त्या रक्ताची व इतर तपासणी करून कानाची शस्त्रक्रिया केली जाते. कानाच्या जवळपास सर्व शस्त्रक्रिया या ऑपरेटिंग मायक्रोस्कोप या दुर्बिणीखाली करण्यात येतात व आजाराच्या स्वरूपाप्रमाणे कानातील खराब हाड काढून टाकतात व कानातील हाडांची साखळी जोडून कानाच्या छिद्रामागे पडदा बसवितात. 
कानाच्या शस्त्रक्रियेनंतर कानाची घ्यावयाची काळजी :-
1) कानामध्ये काही दिवस पाणी जाऊ देऊ नये.
2) कानामध्ये डॉक्टराच्या सल्ल्याने औषधी टाका व वेळोवेळी तज्ज्ञांकडे तपासणीसाठी जा. या आजाराकडे वेळीच लक्ष न देऊन उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन मेंदूत जंतुसंसर्ग होऊन वेळप्रसंगी जीवसुद्धा गमवावा लागू शकतो.Previous Post Next Post