अशी घ्या कानाची काळजीकानातून पू येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर कानांच्या डॉक्‍टरांना कान दाखवा. काही औषधांमुळेही ऐकण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो, असे दिसले आहे. जर कानात घंटी वाजल्यासारखे किंवा अन्य आवाज येत असतील तर डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करा. कर्कश आवाजात सतत गाणी ऐकू नका. पावसाळ्याच्या काळात कानात काही वेळा संसंर्ग होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कान कोरडे राखण्याकडे लक्ष द्या. अंघोळ केल्यानंतर कान पूर्णपणे साफ करा आणि कोरडे करा.

कानात कोणत्याही प्रकारचे तेल घालू नका. कानाच्या पडद्याला छिद्र पडले तर काही काळाने ते भरून निघते. मात्र हे छिद्र मोठे असेल तर शस्रक्रिया करण्याशिवाय पर्याय रहात नाही. खूप वेळ पोहत राहिल्यास कानात पाणी जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळेही कान दुखू लागतात.

तसेच कानातील द्रव पदार्थ बाहेर येऊ लागतात. यापासून कानाचा बचाव करण्यासाठी ईअर प्लगचा वापर करावा. अनेकांना विमान प्रवास करताना कानात दुखू लागल्याचे अनुभव येतात. विमान उतरत असताना ही तक्रार अधिक प्रमाणात जाणवते.

या तक्रारीपासून बचाव करण्यासाठीही विमान प्रवाशांनी ईअर प्लगचा वापर करावा. तसेच विमान उतरत असताना तोंडा च्युईंग गम ठेवल्यानेही कान दुखत नाहीत. कानातील मळ बाहेर निघाला नाही तर तो आत साचून राहतो. या मळावर तेल, धूळ, धूर, कचरा यांचे थर जमा होऊ लागतात आणि हा मळ कडक होऊन जातो.

असा मळ कोणत्याही स्थितीत कानातून बाहेर काढावाच लागतो. कानात काही औषधे घालून कडक झालेला मळ बाहेर काढता येतो. कानातील मळ काढताना कानाच्या पडद्याला इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक असते. तीक्ष्ण वस्तूचा वापर कानातील मळ काढण्यासाठी करू नये.

कारखान्यातील यंत्रांचे आवाज, वाहनांचे हॉर्न यामुळे ध्वनी प्रदुषणाची पातळी सातत्याने वाढत असल्याचे अनुभवास येत आहे.या आवाजांमुळे कानांची ऐकू येण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते. तरूण मंडळींनी मोबाईलच्या अतिवापरामुळे कानांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या रेडियेशनमुळे कानाच्या आरोग्यावर अनिष्ठ परिणाम होतो असे आढळून आले आहे.